या जगप्रसिद्ध मंदीरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड
जगन्नाथपूरी, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
गेल्या काही दिवसांपासून देशभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर किंवा प्रार्थना स्थळांमध्ये प्रवेश करण्यासाठी ड्रेसकोड लागू करण्यात येत आहे. आता ओडिशाच्या जगप्रसिद्ध अशा प्राचीन जगन्नाथ पुरी मंदिरातही कपड्यांसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली असून येत्या जानेवारी महिन्यापासून या मंदिरात येणाऱ्या भक्तांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. १ जानेवारी २०२४पासून नवे नियम लागू होतील. मंदिराच्या सिंह दरवाजावरच सुरक्षा रक्षकांकडून भाविक योग्य प्रकारच्या वेशभूषेतच प्रवेश करत असल्याची खातरजमा केली जाणार आहे.
“मंदिराचं पावित्र्य आणि महत्त्व अबाधित राखणं हे आमचं कर्तव्य आहे. पण दुर्दैवाने काही लोक इतरांच्या धार्मिक भावनांचा विचार न करता मंदिर परिसरात प्रवेश करत असल्याचं दिसून आलं आहे. काही लोक मंदिरात फाटक्या जीन्स, स्लीवलेस कुर्ते, शॉर्ट्स घालून येताना दिसले, जणूकाही ते समुद्र किनाऱ्यावर किंवा बीचवर फिरण्यासाठीच आले असावेत. मंदिर हे भगवंताचं घर असतं, मनोरंजनाचं ठिकाण नाही”, अशा शब्दांत जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासन प्रमुख रंजन कुमार दास यांनी ड्रेसकोड लागू करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
१२व्या शतकात बांधण्यात आलेल्या जगन्नाथ पुरी मंदिराला दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक भेट देतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंदिर प्रशासनावर असते. त्यासंदर्भात प्रशासकीय समितीकडूनच निर्णय घेतले जातात. याचबाबतीत आता नियमावलीसंदर्भातील समितीनं निर्णय घेतला असून येत्या जानेवारी महिन्यापासून नवीन नियम लागू होणार आहेत.
मंदिरात काही लोक असभ्य प्रकारची वेशभूषा करून प्रवेश करत असल्याची तक्रार काही लोकांनी केली होती. त्या तक्रारीची दखल मंदिर प्रशासनानं घेतली असून त्यानुसार हा नियम बनवण्यात आला आहे. यानुसार,मंदिरात प्रवेश करताना फाटक्या जीन्स, स्लीवलेस कुर्ते, हाफ पँट, शॉर्ट्स असे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, कोणत्या प्रकारच्या कपड्यांना परवानगी असेल, यासंदर्भातली नियमावली काही दिवसांत जारी करण्यात येईल, असंही या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
SL/KA/SL
10 Oct. 2023