अष्टविनायकांसह या ५ मंदिरात ड्रेसकोड लागू

पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अष्टविनायक गणपतीसह 5 मंदिरांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून 5 मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. चिंचवड देवसस्थानकडून पत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, चिंचवडचा मोरया गोसावी संजीवनी मंदिर, खार नारंगी मंदिर या 5 मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. हे पाचही देवस्थान चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येतात. त्यामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून वस्त्रसंहितेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
देवस्थानच्या पत्रकात भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की,
“संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते अधा, संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे”.
असा असावा ड्रेसकोड
- पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
- महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.
- कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.
SL/ML/SL
12 April 2025