तुळजाभवानी मंदीरात ड्रेसकोड लागू
तुळजापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. महाराष्ट्रीची कुलस्वामीनी अशी ख्याती असलेल्या तुळजाभवानी मंदीरात वर्षभर भक्तांची गर्दी असते. यामध्ये काही भाविक अयोग्य पोशाख परिधान करून दर्शनाला येतात. यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्ट, उत्तेजक आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक नियमावली जारी केली आहे. शॉर्ट पॅन्ट घालणारे महिला व पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. महिलांना वन पीस आणि शॉर्ट स्कर्ट घालून मंदिरात प्रवेश मिळणार नाही. या सूचना देणारे फलकही मंदिर परिसरात लावण्यात आलेत. त्यानुसार आज मंदिर परिसरात फलकही लावण्यात आलेत.
मंदिर परिसरातल्या फलकावर म्हटले आहे की, अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात मंदिराच्या महाद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी अशाप्रकारचे फलक लावले आहेत.हा निर्णय घेतल्याबद्दल पुजारी वर्गाकडून मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान भक्तांना ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाबाबत सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. फक्त सोवळे नेसून उघड्या अंगाने गाभाऱ्यात वावरणाऱ्या पुजाऱ्यांनाही पूर्ण कपडे घालण्याचा नियम करावा, असा सूर सोशल मिडियावरील चर्चांतून दिसून येत आहे. तर काहीजणांनी या निर्णयाचं स्वागतही केलं आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये नवरात्री उत्सवादरम्यान कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरबाबत असाच निर्णय घेतला होता. शिर्डीमध्येही अशाप्रकारचे फलक लावले होते. पण लोकांच्या विरोधानंतर हे फलक काढून टाकण्यात आले. आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे.
SL/KA/SL
18 May 2023