गेमिंग बंद करुन Dream11 ने सुरु केले फायनान्स ॲप

मुंबई, दि. २५ : ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग लॉ, 2025’ हा कायदा लागू झाला आहे. या कायद्यानुसार, ऑनलाइन पैशांच्या गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे, ड्रीम11 सह इतर ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्सला व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर लोकप्रिय फँटसी गेमिंग कंपनी Dream11 ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ही कंपनी थेट आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. ड्रीम11 ची पॅरेंट कंपनी असलेल्या ड्रीम स्पोर्ट्स ने ‘Dream Money’ नावाचे एक नवीन ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
नवीन ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याने, ड्रीम11 ने त्यांच्या सर्व सशुल्क स्पर्धा बंद केल्या आहेत. यामुळे उत्पन्नाचा स्रोत बदलण्यासाठी कंपनीने हा नवा मार्ग निवडला आहे.
‘Dream Money’ ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या आर्थिक आयुष्याचे नियोजन करण्यास मदत करेल. या ॲपमध्ये अनेक खास सुविधा दिल्या जाणार आहेत:
गुंतवणुकीचे सोपे मार्ग: तुम्ही अगदी 10 रुपयांपासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सुरू करू शकाल. तसेच, सोन्यामध्ये डिजिटल पद्धतीने (digital gold) गुंतवणूक करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.
सुरक्षित मुदत ठेव: हे ॲप तुम्हाला कोणत्याही बँक खात्याशिवाय 1000 रुपयांपासून मुदत ठेव सुरू करण्याची संधी देईल. यासाठी कंपनीने काही स्मॉल फायनान्स बँकांशी भागीदारी केली आहे.
उत्पन्न आणि खर्चाचा मागोवा: हे ॲप तुमच्या खर्चाचा, म्युच्युअल फंड आणि शेअर्समधील गुंतवणुकीचा मागोवा घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करेल.