‘श्री शिवाजी मंदिर’मध्ये नाट्यप्रयोग सुरुच राहणार

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवाजी मंदिर नाट्यगृहात १ जानेवारी नंतरही नाटकाचे प्रयोग सुरूच राहणार आहेत, असे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई’चे अध्यक्ष संतोष काणेकर आणि प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
येत्या १ जानेवारीपासून दादरच्या शिवाजी मंदिर येथे नाट्यप्रयोग होणार नाहीत, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यात काही नाटकांची नावेही देण्यात आली आहेत. मात्र हे वृत्त चुकीचे आहे. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ ही नाट्य निर्मात्यांच्या व्यवसायातील ५५ वर्षे जुनी नोंदणीकृत नाट्य संस्था असून सध्या या ४५ नाट्य निर्माते संस्थेचे सभासद आहेत. यापैकी कोणीही शिवाजी मंदिरबाबत बहिष्काराचे पाऊल उचलले नाही, असे काणेकर, भंडारे यांनी सांगितले.
काही निर्मात्यांनी तसा निर्णय घेतला असेल तर त्यांचे वेगळे प्रश्न असू शकतील. ते त्यांनी शिवाजी मंदिर’च्या संचालक मंडळाकडे मांडायला हवे होते. संचालक मंडळाकडून योग्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असा नाट्य निर्मात्यांचा आजवरचा अनुभव आहे. अलीकडेच आमच्या संघटनेने केलेल्या मागणीनुसार, ‘शिवाजी मंदिर’ संचालक मंडळाने ५०० रुपये तिकिटासाठीचे दुप्पट भाडे (जे महापालिकेच्या नाट्यगृह भाड्यापेक्षा कमी होते) ते कमी करून दीडपट केले आहे. तसेच, संगीत आणि प्रायोगिक नाटकांसाठीही नाट्यगृहाचे भाडे २५ टक्के कमी केले असल्याचे काणेकर / भंडारे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
ML/KA/SL
25 Dec. 2023