नाट्यसमीक्षक, लेखक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

 नाट्यसमीक्षक, लेखक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी (८८) यांचे गोरेगाव येथे निधन झाले. गेली पन्नास वर्षे ते नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. सुरुवातीच्या वर्षात ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात ते नाट्यसमीक्षा लिहीत असत. पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक ही पुस्तके लिहिली आहेत.

नाट्यसमीक्षेसह कमलाकर हे सुरुवातीच्या वर्षांमध्ये सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत पंधरा वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून कार्यरत होते. एखाद्या लोकप्रिय कामगार नेत्याच्या भाषणासारखी त्यांची लेखनशैली आहे; असे नाट्यसृष्टीत त्यांच्या लेखनाविषयी म्हंटले जायचे. नाट्य संहिता वाचून, तिच्यातले बारकावे काढून, प्रयोगाच्या मर्यादा दाखवत ते नाट्यसमीक्षा लिहायचे.

त्यांच्या परीक्षणांची शीर्षकं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आयएनटीच्या ‘अबक दुबक तिबक’ नाटकाला ‘धबक धबक धबक’ असे शीर्षक देऊन त्यांनी त्या नाटकाची पिसे काढली होती. अमोल पालेकरांच्या ‘राशोमान’ला त्यांनी ‘ठुंग फुस्स’ असे शीर्षक दिले होते (कारण मूळ कलाकृती जपानी होती.) ‘चंद्रलेखा’च्या ‘स्वामी’ नाटकाचं त्यांनी ‘शनिवारवाड्याचा स्वामी’ आणि ‘रविवारवाड्याचा स्वामी’ असं दोन भागांत परीक्षण लिहिले होते.

लेखक कितीही प्रसिद्ध असला तरीही तो नाडकर्णींच्या लेखणीचे तडाखे खात असे. अगदी कानेटकर, तेंडुलकरांनाही या प्रथितयश नाटककारांच्या नाटकांची त्यांनी परखड समीक्षा केली. त्यामुळे नाडकर्णींच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते.

नाडकर्णींना अ. भा. मराठी नाट्य परिषदेने २०१९ सालचा जीवन गौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला.

SL/KA/SL

12 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *