फासे पारधी तरुणाने फुलविली ड्रॅगन फ्रुटची शेती !

यवतमाळ दि.२८ ( आनंद कसंबे ) : तितर, बटेर किंवा ससा अशा पशुपक्ष्यांची शिकार करून पोटाची खळगी भरणारा फासेपारधी समाज, तसा अठराविश्व दारिद्रयात जीवन जगणारा हा समाज .आजही मुख्य प्रवाहाच्या कोसो दूर आहे. मात्र याच समाजातील एका जिद्दी तरुणाने चक्क ड्रॅगन फ्रुट ची शेती फुलवली आहे .
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस जवळच्या आनंदवाडी येथील अमोज चव्हाण या तरुणाने ही किमया साधली आहे.खरंतर त्याची शेती गावापासून दूर आहे. शेतात जायला चांगला रस्ता नाही .थोडा पाऊस जास्त झाला तर बैलगाडीही शेतात जाऊ शकत नाही. पायीच जावे लागते. परंतू तो रडगाणे गात बसला नाही. घरची हलाखीची परिस्थीती बदलायची असेल तर अशा संकटांचा सामना केलाच पाहिजे हा विचार त्याने केला आणि तो कामाला लागला.
सर्वप्रथम अमोजने यासाठी चक्क मोबाईलवरुन माहिती मिळविली.नंतर प्रत्यक्ष सोलापूर, सातारा, हैद्रराबाद इत्यादी ठिकाणी जाऊन ड्रॅगन फ्रुट शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली , अभ्यास केला. यानंतर त्याने आपल्या तीन एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली . यासाठी त्याने मल्चींग पध्दतीचा वापर केला. ज्यामुळे पाण्याची बचत होते, किंबहुना ड्रॅगन फ्रुटच्या रोपटयांना पाहिजे तेवढेच पाणी मिळते. याला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न देता घरचेच शेणखत तथा सेंद्रीय खत दिले. याशिवाय योग्य ते खबरदारी घेत शेती फुलवली.
स्वतः सह त्याचा संपूर्ण परिवार शेतातच रहायला आला. अहोरात्र कष्ट केले. पहाता पाहता अमोजच्या प्रयत्नाला यश आलं ड्रॅगन फ्रुट ची झाडे फळांनी बहरुन आली. हे पीक लागवडीनंतर साधारणता दीड वर्षांनी काढणीला येते. नंतर एका वर्षात चार ते पाच वेळा पीक काढता येते. परिणामी आज तो वर्षाकाठी खर्च जाऊन एकरी दीड लाख रुपये इतकं उत्पन्न घेत आहे.
विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे कोणते इत्यादी माहिती सुध्दा तो अतिशय चांगल्या प्रकारे समजाऊन सांगतो.याच्या शेतातील मालाची विक्री नागपूर, अमरावती सारख्या महानगरात विक्रीला जात आहे. याशिवाय कधी कधी स्थानिक बाजारात चिल्लर विक्री सुध्दा तो करतो. साहजिकच यातून जास्त नफा मिळतो.
कृषी विभागा व्दारा यवतमाळ येथे नुकताच रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अमोजला ड्रॅगन फ्रुट विक्रीसाठी स्टॉल दिला होता. यावेळीही ड्रॅगन फ्रुट ची चांगली विक्री झाली.यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या स्टॉलला भेट देऊन अमोजचा गौरव केला आहे. अमोज फक्त ड्रॅगन फ्रुट ची शेती करुनच थांबला असे नाही. त्याने या पिकाची रोपे सुध्दा तयार केली. सदर रोपे परिसरातील शेतक-यांनी विकत घेतली असून ते सुध्दा ही शेती करीत आहेत.
राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे अमोजला अनुदान सुध्दा मिळाले आहे. अमोज चव्हाणची ड्रॅगन फ्रुट ची पाहिल्यावर पुन्हा एकदा सिध्द होते केल्याने होते आहे आधी केलेच पाहिजे.
ML/KA/SL
28 Aug 2023