दूरदर्शन स्पोर्ट्सची एच. डी. वाहिनी सुरू
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशात खासगी स्पोर्ट्स वाहिन्यांची चलती सुरू असताना ‘डीडी स्पोर्ट्स’ ही दूरचित्रवाणी वाहिनी आता ‘डीडी स्पोर्ट्स एचडी वाहिनी झाली आहे. सध्या ही वाहिनी DD फ्री डिश सेवेतील ०७९ क्रमांकाच्या वाहिनीवर उपलब्ध आहे.
देशाची सार्वजनिक प्रसारक असलेल्या प्रसार भारतीने सरकारी वाहिन्यांमध्ये आणखी एका हाय डेफिनिशन वाहिनीची भर घातली असून सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धांच्या प्रसारणाने आता डीडी स्पोर्ट्स एचडी या वाहिनीच्या कार्याची सुरुवात होत आहे. यामुळे देशभरातील क्रीडारसिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणीच केवळ पूर्ण होणार नसून, बदलत्या काळानुसार डीडी वाहिन्यांचे संपूर्ण जाळे परिवर्तीत करण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक निर्णायक पाऊल आहे.
डीडी स्पोर्टस एचडी वाहिनी आता क्रीडाप्रेमींची पहिल्या पसंतीची वाहिनी होणार आहे. या प्रेक्षकांना आता महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे प्रसारण हाय डेफिनिशन क्षमतेसह पाहायला मिळेल.. येत्या काही महिन्यांमध्ये डीडी स्पोर्ट्स ही वाहिनी नवनवीन कार्यक्रमांसह प्रेक्षकांसमोर येणार आहे.
SL/KA/SL
7 Sept. 2023