आंदोलन हिंसक होऊ देऊ नका, अन्यथा वेगळा निर्णय…
जालना, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आंदोलन हिंसक न करण्याचे आवाहन केले असून हिंसा आणि जाळपोळ थांबली नाही तर मी माझा वेगळा निर्णय घेईन असा इशारा त्यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. एकीकडे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असतानाच मराठा समाजाच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. काही ठिकाणी नेत्यांची घरे आणि कार्यालये जाळण्याच्या घटना घडत आहेत, काही ठिकाणी बसेस ची जाळपोळ होत आहे , तर यामुळे अनेक ठिकाणी एस टी गाड्यांची वाहतूक बंद पडली आहे. याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत आहे . हिंसक आंदोलन थांबलं नाही तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
‘मी सगळ्यांना साखळी आणि आमरण उपोषण शांततेत करायला सांगितलं होतं. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका, हे कोण करतंय ही शंका आहे. असे प्रकार सत्ताधारी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत करून घेतात का अशी शंका देखील त्यांनी बोलून दाखवली आहे .
मी मराठा समाजाला जाहीर आवाहन करतो, जाळपोळ करू नका आणि नेत्यांच्या घरी जाऊ नका, नाहीतर मी उद्या वेगळा निर्णय घेईन, धिंगाणा नको. जाळपोळीला माझं समर्थन नाही. हे थांबलं पाहिजे असे ते म्हणाले.
आंदोलकांचे आंदोलन वेगळ्याच कारणासाठी
या दरम्यान धुळे – सोलापूर रस्त्यावर मराठा आरक्षण आंदोलक वेगळ्याच कारणासाठी आंदोलन करीत होते . जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, आवश्यक ते औषध पाणी , उपचार घ्यावेत अशी त्यांची मागणी आहे. आम्हाला गड हवा आहे पण त्यासोबत सिंह देखील हवा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत जरांगे उपचार घेत नाहीत तोवर आपले आंदोलन सुरू राहील अशी त्यांची मागणी होती.
ML/KA/SL
30 Oct. 2023