आपल्या पोतडीत अनेक गोष्टी , संस्कृती सोडायला लावू नका

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या अधिवेशनात विरोधकाचं गलबत पूर्ण भरकटलं आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या नेत्यांनी केलं नाही, त्यांचं अवसान गळाले होते अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली, विरोधकांनी उपस्थित केलेल्या महागाई , बेरोजगारी तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावर ते उत्तर देत होते. आपल्या पोतडीत अनेक गोष्टी आहेत त्या अद्याप बाहेर काढलेल्या नाहीत , आम्ही संस्कृती पाळतो ती सोडायला लावू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
परदेशी गुंतवणुकीत महा विकास आघाडी सरकारच्या काळात मागे पडलेलं राज्य आम्ही पुन्हा अग्रेसर केलं आहे. कोविड काळात मागील सरकारनं भ्रष्टाचारा चा कळस गाठला. मुंबई महापालिकेत कंत्राटे देताना नियम धाब्यावर बसवले गेले असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोविड काळात लोकांचे जीव जात असताना काही लोग स्वतःची पोळी भाजत होते, ऑक्सीजन प्लांटच्या कथाही सुरस आहेत. असं मुख्यमंत्री म्हणाले. रोमिल छेडा याच्या हायवे कंपनीने कोणती कोणती कंत्राटे कशी मिळवली त्याची जंत्री त्यांनी यावेळी वाचून दाखवली. आदित्यच्या कृपेने वरुण राजाने टेंडर्सचा अक्षरशः पाऊस पाडला असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कायदा सुव्यवस्था
राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती चांगली असून महिला आणि मुली राज्यात अत्यंत सुरक्षित आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना सांगितलं. आकड्यांच्या आधारे गुन्ह्यांचे प्रमाण न मोजता समाज किती भयमुक्त आहे यावर राज्याची कायदा सुव्यवस्था स्थिती बघायला हवी असं ते म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी दाखल ५४८ गुन्ह्यांपैकी ९० टक्के गुन्हे मागे घेण्यात आले असून ४७ गुन्हे मागे घेणे शक्य नाही असं फडणवीस म्हणाले. वरिष्ठ नागरिक , लहान मुले आणि ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे. यावर्षी ८०२ कोटींची तरतूद पोलीस इमारतींसाठी करण्यात आली आहे असं उपमुख्यमंत्री म्हणाले.Don’t leave many things, culture in your belly
ML/KA/PGB
20 Dec 2023