‘भारतात जाऊ नका’, अमेरिकन महिलेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई, दि. २४ : “भारतात जाऊ नका” असे आवाहन करणाऱ्या एका अमेरिकन महिला पर्यटकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिस्टन फिशर असे नाव असलेल्या या महिला पर्यटकने असे इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या मागील कारणही फार विशेष आहे. क्रिस्टन यांनी रिव्हर्स सायकॉलॉजी वापरत भारताच्या सौंदर्याची आणि संस्कृतीची प्रशंसा केली आहे. त्यांच्या मते, भारतात येणे म्हणजे जीवन बदलणारा अनुभव आहे, जो तुम्हाला परत जाण्यापासून रोखू शकतो. 15 जून 2025 रोजी पोस्ट केलेल्या या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी बघितले आहे.
क्रिस्टन सध्या दिल्लीत त्यांच्या पती आणि चार मुलांसह राहतात. त्या ‘स्कायफिश डेव्हलपमेंट’ नावाचा व्यवसाय चालवतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “भारतात जाऊ नका, कारण इथली माणसे, खाद्यपदार्थ, स्थळे आणि समृद्ध संस्कृती तुमचे आयुष्य बदलून टाकेल. तुम्हाला परत जावेसे वाटणार नाही!”
त्यांनी भारतातील चार वर्षांच्या वास्तव्यातील अनुभव शेअर करत म्हटले, “भारताने माझे हृदय जिंकले आहे. मी इथे राहायला आले आणि कधीही मागे वळून पाहिले नाही.”
क्रिस्टन यांच्या व्हिडिओला जगभरातील प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे. एका यूजरने लिहिले की, “भारतातून परतायचे नव्हते, इतका तो देश सुंदर आहे!” दक्षिण आफ्रिकेच्या एका नागरिकाने लिहिले, “2018 मध्ये भारतात 3 महिने घालवले आणि 2021 मध्ये केरळमध्ये स्थलांतरित झालो. भारतातील माझे निवृत्त जीवन खूप आवडते.” अनेकांनी भारताच्या संस्कृती, खाद्यपदार्थ आणि अतिथ्यशीलतेचे कौतुक केले आहे.
क्रिस्टन यांनी 22 जून रोजी आणखी एका व्हिडिओत भारतातील जीवनाचा अनुभव शेअर केला. “मी अमेरिकेतील सामान्य जीवन सोडून भारतातील असामान्य जीवन निवडले,” असे त्या म्हणाल्या. “या गेल्या 4 वर्षांत मी काही अद्भुत लोकांना भेटले आहे, काही अविश्वसनीय ठिकाणे पाहिली आहेत, काही उत्कृष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे आणि माझे हृदय कायमचे बदलून गेले आहे. भारताने माझे आयुष्य कायमचे बदलले आहे आणि मी कधीही पूर्वीसारखी राहणार नाही. तुम्हाला एकच जीवन मिळते, ते तुम्ही कसे जगाल?” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.