दोन दिवसांत आरक्षणावर निर्णय नाही तर पाणी पिणार नाही!

मुंबई, दि २९
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारने जर दोन दिवसात मनावर घेत आरक्षण दिले नाही तर पाणी पिण्याचे सोडणार असे सांगत सरकारला दोन दिवसाची मुदत दिली.
आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, दोन दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा. आडमुठेपणाची भूमिका सरकारने घेऊ नये.
हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव आझाद मैदानावर ठिय्या मांडून आहेत. आज सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून आला. पिण्याचे पाणी, निवारा आणि इतर मूलभूत सुविधा न मिळाल्याने संतापलेले कार्यकर्ते सरकारवर रोष व्यक्त करत होते.
याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की –
“आम्ही शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत. पण सरकार जर कानाडोळा करत असेल, तर आम्हालाही कठोर भूमिका घ्यावी लागेल. दोन दिवसांत आरक्षणाचा निर्णय झाला नाही, त्यानंतर काय होईल, याची जबाबदारी सरकारवर असेल.”
जरांगे यांच्या या वक्तव्याने मैदानात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून घोषणाबाजीला उधाण आले. आंदोलनकर्त्यांना मुंबईच्या आसपास असणाऱ्या परिसरात जी मैदाने असतील तिथे आपल्या गाड्या पार्क करा. उद्या रेल्वेने पुन्हा आझाद मैदानात या असे आवाहन त्यांनी केले.KK/ML/MS