काटेभेंडीचं दबदबीत!

 काटेभेंडीचं दबदबीत!

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधी हात धुवुन घ्या, कसल्या कसल्या कीबोर्ड वर टाईप करुन येऊन तसल्याच हाताने भेंडी हातात घेतली तर ती चिडते. मग भेंड्या धुवु नका, त्या कोरड्या कापडाने प्रेमाने पुसुन घ्या. प्रेमाने पुसा, रागाने जोराजोरात पुसल्यास भेंडी चा काटा घुसला तर इथे प्रतिसादात येऊन माझ्या माथ्यावर त्याचे खापर फोडाल! आता ते कापड बाजुला ठेवा आणि भेंडीची साले काढुन भेंडीची कणसे दाण्यांसकट वेगळी करा. आणि मग डस्ट्बिन मध्ये टाका. साले टाका म्हणजे, नाहीतर कणसे टाकाल. आणि आता गॅस चालु करा, जो गॅस चालुय त्याच गॅस वर एक तवा ठेवुन द्या. मग टीव्ही चे चॅनेल बदलुन या, तोवर तवा तापेल…. बरोबर गॅस वर ठेवला असेल तर. मग तव्यात ती भेंडीची कणसे टाका, हलकेच परता, देव तुमच्याबरोबर असेल तर दाणे कणसातुन वेगळे होणार नाहीत, ते वेगळे झाले तर सगळं तसंच टाकुन गन्गोत्रीला जाउन डुबकी मारुन या. कणसे करपु द्यायची नाहीत नाहीतर कोळश्यचा रस्सा करावा लागेल. ४-५ मिनिटानी गॅस बंद करा, तवा उघडा ठेवा लगेच झाकु नका. झुरळ पाल कुत्री मांजरी कुणीही त्या तव्यात पडणार नाही गरम वस्तुजवळ जाऊ नये एवढी अक्कल असते त्यांना उपजत!

आता ते गार होईपर्यंत मसाला करायचा. तर कोथिंबीर (चवीनुसार, मला आवडते म्हणुन मी बरीच घालतो), आले, लसूण, नाराळाचा कीस, मिरच्या हे मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्या. घरी असताना आई मला हे खलबत्त्यात वाटायला लावते, त्याने “वेगळीच चव” येते. तेवढा पेशन्स असेल तर ते करा हो नक्की! मग परत गॅस चालु करा, वेगळा गॅस, नाहीतर पुन्हा कणसे भाजलेला गॅस चालु कराल आणि पुन्हा कोळसा! त्या गॅस वर कढईला बसवा. मगापासुन एकच चॅनेल चालु आहे ते बदलुन या टीव्ही चे परत. तापलेल्या कढईत जरा तेल सोडा. डाएट कॉन्शस असाल तरी जरा सढळ हाताने सोडा, नंतर खाताना कमी खा! (कमी खावं, खरं चवीनं आणि चवीचं खावं असं आई म्हणते) उगाच डाएट च्या नावाखाली कायतरी कमी तेल घातलं आणि रस्सा चांगला झाला नाही तर तुमच्यावर नाव! तापलेल्या तेलात कांदा घाला. कसा म्हणुन काय विचारताय? चिरुन मग घाला नाहीतर आर्धा कांदा भसकन् घालाल तसाच्या तसा. तो लालसर झाला कि त्यात टोमॅटो घाला. हो, टोमॅटो पण कापुनच घाला अणि एखादी फोड खाऊन बघा की तो कडु आहे का ते! आता त्यात लाल कांदा लसुण तिखट घाला. त्या तिखटाचं तेल सुटलं कि त्यात ती कणसे घाला भाजलेली. जरा बसा दोन तीन मिनिटं, दमल्याचा आव आणुन. आर्धा कांदा आणि आर्धा टोमॅटो कापुन हात दुखले असतील नाही तुमचे? उठा आता, बसायला संगितलेलं झोपायला नव्हे! आता त्यात आमसुल घाला, ते नसेल तर चिंच घाला, ती नसेल तर लिम्बुचा रस, तो नसेल तर एडिबल सायट्रीक अ‍ॅसिड घाला आणि तेही नसेल तर पृथ्वीवर या पटकन कारण तुम्ही मंगळावर गेलेले आहात राहायला! वाटण घाला मग त्यात आणि चांगलं ढवळुन त्यावर झाकण घाला आणि रामभरोसे सोडुन द्या रस्श्याला! १५ मिनिटात वगैरे रस्सा तयार होईल, मग झाकण काढा आणि रस्श्यावर चिरलेली कोथिंबीर फेका जराशी, नेम धरुन जोरात फेकु नका लांबुन, नाहीतर गरम रस्सा अंगावर येईल आणि परत माझ्या नावाने खडी फोडाल! आता परत झाकण ठेवा आणि गॅस बंद करा. दोन मिनिटे वाफेवर कोथिंबिरीचा स्वाद त्या रस्श्यात उतरु द्या!

PGB/ML/PGB
1 Apr 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *