कुत्रा चावून मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाख भरपाई , जखमींना 5 हजार
बंगळुरु, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांची उपस्थिती पूर्णतः हटवण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतो. या आदेशानंतर आता राज्य सरकारांनी विशेष कारवाई सुरु केली आहे. देशभरात दरवर्षी 20 हजार ते 25 हजार लोक रेबीजमुळे मृत्यू पावतात. ही गंभीर बाब लक्षात घेता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच कर्नाटक सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकार भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला थेट 5 लाख रुपये मदत देणार आहे. जखमी व्यक्तींना 5000 रुपये मदत मिळेल, त्यात 3500 रुपये थेट पीडिताला तर 1500 रुपये उपचारासाठी सुवर्ण आरोग्य ट्रस्टला दिले जातील.
त्वचेत खोल छिद्र पडणे, मोठ्या जखमा, शरीरावर काळेनिळे डाग किंवा एकाच वेळी अनेक चावा घेतल्यास ही भरपाई लागू होईल. ही योजना फक्त भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांसाठी आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांची गंभीरता आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना आणल्याचे कर्नाटक सरकारने म्हटलंय. यामुळे उपचाराचा खर्च भागेल आणि मृताच्या कुटुंबाला दिलासा मिळणार आहे. कर्नाटक सरकारने भरपाई देऊन यासाठी पुढाकार घेतला आहे.
SL/ML/SL