तुम्हाला माहिती आहे का? अंतराळात नऊ महिने राहून सुनीता विल्यम्स यांनी काय केले?

नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी पहाटे पृथ्वीवर परतले. नऊ महिन्यांच्या काळात त्यांनी तिथे काय केले याबाबत नासाने माहिती दिली आहे.विल्यम्स आणि विल्मोर ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले. ८ दिवसांची मोहिम अनपेक्षित तांत्रिक बिघाडांमुळे नऊ महिने लांबली. परंतु वाढलेल्या वेळेनंतरही सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र राहिल्या.सुनीता यांनी अंतराळ स्थानकाबाहेर तब्बल ६२ तास नऊ मिनिटे व्यतीत केली. नऊ वेळा अंतराळात स्पेसवॉक केला. विल्यम्स आणि त्यांच्या पथकाने ९०० तास संशोधन केले. दरम्यान, त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले.तसेच अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले.शिवाय विल्यम्स यांनी सर्वांत महत्त्वाच्या अशा बायोन्यूट्रिएंट्स प्रकल्पावर काम केले. हे संशोधन अंतराळवीरांसाठी ताजे पोषक घटक तयार करण्यासाठी कसे वापरले जाऊ शकतात याचा शोध घेते. पृथ्वीपासून लांब राहिल्यावर अंतराळवीरांना आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे कशी मिळू शकतात यावरही अभ्यास करण्यात आला.अशा अनेक महत्वाच्या संशोधन प्रकल्पांवर त्यांनी या ९ महिन्यात काम केले.