मुंबईत या ठिकाणी नक्की भेट द्या
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वप्ननगरी म्हणून कायमच मुंबईकडे पाहिलं जातं. त्यामुळे आर्थिक राजधानी असलेल्या या शहराविषयी अनेकांना उत्सुकता आणि कुतुहल असल्याचं पाहायला मिळतं. घडाळ्याच्या काटावर सतत धावणाऱ्या या मुंबईमध्ये अनेक गोष्टी पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतात. यात मुंबईला लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू कायमच पर्यटकांना खुणावत असतात. मुंबईमध्ये अशा काही वास्तू आहेत ज्या इंग्रजांच्या काळापासून येथे आहेत. त्यामुळे मुंबईला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गेटवे ऑफ इंडिया असो किंवा गोराईमधील पॅगोडा असो. अशी अनेक ठिकाणं मुंबईचं वेगळंपण जपतात आणि त्या मुंबईला खास बनवतात. त्यामुळेच मुंबईतील लोकप्रिय आणि ऐतिहासिक वास्तू कोणत्या ते आज जाणून घेऊयात.
राजाबाई टॉवर –
मुंबईतील सर्वात चर्चेत राहणारी वास्तू म्हणजे राजाबाई टॉवर. लंडनमधील बिग बेन टॉवरप्रमाणे दिसणारी ही वास्तू ब्रिटीश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली. १८७० मध्ये हा टॉवर उभारण्यात आला असून त्याची उंची २३० फूट इतकी आहे. हा टॉवर चर्चगेट स्थानकाजवळी परिसरात आहे.
गेटवे ऑफ इंडिया –
पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. अनेक भारतीयांप्रमाणेच विदेशी नागरिकदेखील खास या ठिकाणाला भेट देतात. इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) भारत भेटीला आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी हे प्रवेशद्वार तयार करण्यात आलं होतं.
बृहन्मुंबई महानगरपालिका –
सामान्यांपासून राजकीय व्यक्तींपर्यंत सगळ्यांमध्ये कायमच मुंबई महानगरपालिकेची चर्चा रंगत असते. १८९३ मध्ये देशात पहिली बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापन करण्यात आली. महानगरपालिकेची ही प्रचंड मोठी इमारत असून त्याची रचना अत्यंत कल्पकतेने करण्यात आली आहे.
फ्लोरा फाऊंटन/ हुतात्मा चौक –
मुंबईतील आकर्षण म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण म्हणजे फ्लोरा फाऊंटन. आता ही वास्तू हुतात्मा चौक या नावाने प्रसिद्ध आहे. मुंबईतील फोर्ट विभागातील हा एक चौक असून इ.स.१८६४ मध्ये तो तयार करण्यात आला आहे. डेव्हिड ससून यांनी त्यांच्या मरण पावलेल्या फ्लोरा या मुलीच्या स्मणार्थ हे स्मारक तयार केलं होतं. याच ठिकाणी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी बलिदान देणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठीदेखील स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालय-
मुंबईतील ऐतिहासिक वास्तू म्हणजे मुंबई उच्च न्यायालय. सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक म्हणून ते खासकरुन ओळखलं जातं.
पॅगोडा –
मुंबईपासून किंचित अंतरावर असलेल्या गोराई परिसरात ही वास्तू आहे. २००० साली ही वास्तू उभारण्यात आली असून गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांचा संग्रह आणि जपणूक करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. ही वास्तू प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथे एकाच वेळी ८ हजारांपर्यंत लोक सहज बसू शकतात. तसंच या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही आधारस्तंभाशिवाय उभी आहे.
मुंबई विद्यापीठ –
भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात येतो. मुंबईतील फोर्ट परिसरात या विद्यापीठाची मुख्य वास्तू असून सांताक्रुझ येथे दुसरं संकुलदेखील आहे. फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधल्याचं म्हटलं जातं.
ML/KA/PGB
1 Nov 2023