१५ दिवस अयोध्येत येवू नका! भाविकांना प्रशासनाचे आवाहन

अयोध्या, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी देशविदेशातील भाविक येत आहेत. हेच भाविक पुढे राम नगरी अयोध्येत पोहोचत आहेत. गेल्या तीन दिवसांत तर गर्दीमध्ये अभूतपूर्व वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्या परिसरातील भाविकांनी पुढील १० ते १५ दिवस रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येऊ नये, असे आवाहन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.
चंपत राय यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रयागराजहून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. प्रयागहून अयोध्येला भाविक रेल्वे आणि रस्ते दोन्ही मार्गांनी येत आहेत. गेल्या तीन दिवसांत अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. अयोध्या धामची लोकसंख्या आणि आकार पाहता एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने भक्तांना रामलल्लाचे दर्शन देणे खूप कठीण आहे आणि त्यामुळे भक्तांना त्रास होत आहे. परिणामी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळच्या भागातील भाविकांनी १५-२० दिवसांनी अयोध्येत दर्शनासाठी यावे अशी विनंती आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना रामलल्लाचे दर्शन सहज घेता येईल. हे सर्वांसाठी सोयीचे असेल. वसंत पंचमीनंतर फेब्रुवारी महिन्यात खूप आराम मिळेल. हवामानही चांगले होईल. कृपया माझ्या या विनंतीचा विचार करा असेही चंपत राय यांनी म्हटले आहे.
SL/ML/SL
29 Jan. 2025