काटेकोरपणे व्यवस्थापन कसे असावे याचा आदर्श म्हणजे ‘ज्ञानदीप‘ पतसंस्था
आ. प्रविण दरेकर

मुंबई, दि १४- एखादी संस्था मोठी होते, वाढते, त्या संस्थेचे नेतृत्व तेवढे सक्षम व पारदर्शी असेल तरच हे होऊ शकते. जिजाबा पवार यांचे बहूआयामी नेतृत्व आहे. संस्थेच्या बाबतीत त्यांचा जिव्हाळा नेहमीच दिसून येतो. काटेकोरपणे व्यवस्थापन कसे असावे याचा आदर्श ज्ञानदीप संस्था आहे, असे कौतुकास्पद विधान भाजपा गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले.
आज मुलुंड येथे ज्ञानदीप को.ऑप. क्रेडिट सोसायटीची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत आ. दरेकर बोलत होते. याप्रसंगी ज्ञानदीपचे अध्यक्ष जिजाबा पवार, संस्थापक विश्वनाथ पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत धमाळ, चंद्रकांत शिंदे, बाळकृष्ण पवार, एकनाथ जगताप, विजय खासुर्डे, अमित पवार, शुभम पवार, किरण तपकीरे, छाया शिंदे, कर्मचारी प्रतिनिधी संजय शिर्के, लक्ष्मण चव्हाण, पिसे, भिलारे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, ज्ञानदीप सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा प्रकारची संस्था आहे. एक पतसंस्था कशी चांगली चालवून सहकार चळवळीला, सर्वसामान्यांना हातभार लावू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण ज्ञानदीप सहकारी पतपेढी आहे. सर्व संचालकांनी आपल्या सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अलिकडच्या काळात सहकारी संस्था, सहकारी बँका चालवणे सोपे काम राहिलेले नाही. अशा परिस्थितीत हे संचालक मंडळ संस्थेचा कारभार गेली ४६ वर्ष व्यवस्थित अविरहितपणे चालवत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर म्हणाले कि, ज्या मुंबई बँकेचे मी नेतृत्व करतो ती बँक बाराशे कोटीची होती. आता १५ हजार कोटींवर गेली आहे. या बँकेने प्रचंड सामाजिक योगदान दिले. मुंबई बँकेचे नेतृत्व करताना अनेक योजना आणल्या, सरकारच्या विविध उपक्रमांना हातभार लावला,कोकण रेल्वेसाठी १५०-२०० कोटी देण्याचे काम केले. मुंबई बँक शहरातील बँक. परंतु ग्रामीण भागातील साखर कारखाने जगले पाहिजेत या भावनेतून त्यांनाही मदत करण्याचे काम करते. अनेक प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहिले त्यांना मुंबई बँकेने मदत केली. सामाजिक भान व जाणीव ठेवून आम्ही काम केले. ज्याची पत नाही त्याची पत निर्माण करण्यासाठी ताकद देणारी संस्था म्हणजे पतसंस्था आहे. ज्याला कुणाचाच सहकार नाही, कुणाचे पाठबळ नाही त्याला सहकारी बँक, सहकारी व्यवस्था म्हणजे सहकारी चळवळ होय. या भूमिकेतून आपण सर्वांनी काम केले पाहिजे, असे आवाहन दरेकर यांनी केले.
मुंबईत स्वयं पुनर्विकास योजना आणली. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला राजाश्रय दिला. अनेक सवलती या योजनेला दिल्या. मुंबईत आज २०-२२ इमारती उभ्या राहिल्या आहेत. हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाले असून आता स्वयं पुनर्विकासाचे हे अभियान राज्यभर सुरु झाले आहे. सरकारने माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती नेमली. या समितीने अडीच महिन्याच्या काळात आपला अहवाल सरकारला सादर केला. मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल जसाच्या तसा स्वीकारला असल्याचेही दरेकर यांनी म्हटले.
सहकारी संस्था वाढल्या पाहिजेत
दरेकर म्हणाले कि, सहकारी संस्था वाढल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन काम करावे लागणार आहे. एकेकाळी सहकार हा राज्याचे वैभव होता. आपली अर्थव्यवस्था सहकारावर अवलंबून होती. हे गतवैभव पुन्हा आणण्याची गरज आहे. ज्यावेळी सहकारातील नेते, कार्यकर्ते आणि संस्था एकत्रित येऊ त्यावेळी देशात महाराष्ट्र सहकारात पुढे असेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
राज्य सहकारी संघाचे गतवैभव पुन्हा आणायचे
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा वैभवशाली ऐतिहासिक अशा प्रकारचा संघ असून त्याची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत झाली. कधीकाळी राज्याच्या सहकाराला हा संघ दिशा द्यायचा ते गतवैभव पुन्हा आणायचे आहे. येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीत संघाच्या माध्यमातून सहकार चळवळीला योग्य दिशा मिळण्यासाठी जे करावे लागेल ते करणार असल्याचेही दरेकरांनी नमूद केले. KK/ML/MS