मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
मुंबई दि.9(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात आज सकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना दिवाळी सण – 2023 करिता सानुग्रह अनुदान (बोनस) म्हणून 26 हजार रुपये इतका बोनस जाहीर केला आहे. तर आरोग्य सेविकांना एका महिन्याची पगार बोनस म्हणून मिळणार आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनादेखील 26 हजार रुपये इतका बोनस मिळणार आहे. यामुळे यंदा ही
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
दिवाळी बोनसच्या मागणीबाबत कर्मचारी संघटनांची मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह यांची मुख्यमंत्र्यांसोबत सानुग्रह अनुदान मिळावं यासाठी बैठक पार पडली.
मागील वर्षी 22, 500 रुपये इतका दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. यावर्षी 30 हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी कर्मचारी कामगार संघटना समन्वय समितीने केली होती. त्यामुळे मुंबई महापालिका किती बोनस जाहीर करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मागील वर्षी 22 हजार पाचशे रुपये बोनस मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मिळाला होता. यंदाच्या वर्षी या बोनस मध्ये साडेतीन हजारांची वाढ करत 26 हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. ही रक्कम शुक्रवार 10 नोव्हेंबर, 2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .
SW/KA/SL
9 Nov. 2023