चतुर्दशी: दिवाळी फराळ नरकचतुर्दशी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळीची सुरुवात करणारी
– राधिका अघोर
दिवाळीतला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते, त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. यादिवशी, श्रीकृष्णाने सत्यभामेच्या मदतीने, नरकासुराचा वध करुन, त्याच्या तावडीत असलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांची सुटका केली होती, त्यांना नवे आयुष्य दिले होते,अशी आख्यायिका आहे. त्यावरून, या तिथीला नरकचतुर्दशी असे नाव पडले. त्याशिवाय, नरक म्हणजे स्वर्ग-नरक कल्पनेतील नरकही मानला जातो. ह्या दिवशी, पहाटे उजाडण्याआधी तीळाच्या सुवासिक तेलाने मर्दन केले जाते. घरातल्या सगळ्यांचे औक्षण केले जाते, आणि त्यानंतर सुगंधी उटणे लावून स्नान केले जाते. पहाटे दिवे लावण्याची आणि फटाके फोडण्याचीही पद्धत आहे. दिवाळीच्या सुमारास, थोडीफार थंडी सुरु झाली असते, त्यामुळे त्वचा रुक्ष होते, त्वचेची काळजी घेण्यासाठी मंगल स्नान म्हणून कोमट तेलाने मर्दन आणि उटणे लावून स्नान केले जाते. हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे, स्निग्ध पदार्थ सेवन केले जातात. याचा विचार करुनच, दिवाळीत फराळाचे पदार्थ, शेव, चिवडा, चकल्या, लाडू, करंजी, अनारसे, शंकरपाळे अशी व्यंजने केली जातात. घरातल्या सगळ्यांचे अभ्यंगस्नान झाल्यानंतर फराळ केला जातो. उत्तर भारतात नरकचतुर्दशीला ‘छोटी दिवाली’ असेही म्हणतात. हा दिवस उत्तर भारतात महत्वाचा मानला जातो. दिवाळीच्या आधीचा दिवस तिकडे दीप आरती आणि दीपोत्सव, फटाके यांनी साजरा केला जातो. नाट्य संगीताची समृध्द परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्रात, नरकचतुर्दशीच्या दिवशी ‘दिवाळी पहाट’ हा सांस्कृतिक आणि सांगीतिकदृष्ट्या समृद्ध कार्यक्रमाची देखील परंपरा आहे. मोठमोठे दिग्गज कलाकार या दिवशी आपली संगीत सेवा प्रेक्षकांना सादर करत असतात.
महाराष्ट्राच्या संबंध सांस्कृतिक आणि साहित्यिक कलापरंपरेला साजेसे असे दर्जेदार आणि बहारदार गीतांचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या अनेक शहरात ‘दिवाळी पहाट’ या नावाने होतात, त्यामुळे ही देखील आता नरकचतुर्दशीची परंपराच झाली आहे, असे म्हणता येईल. एकंदरीतच दिवाळी हा उत्सवाचा, प्रकाशाचा सण आहे. पूर्वी शेतीचा हंगाम संपल्यानंतर पीक आल्यावर किंवा व्यापार उदिमात यश, धन मिळाल्यानंतर ते साजरे करण्यासाठी म्हणून दिवाळी हा उत्सव साजरा होऊ लागला. साहाजिकच त्याची सांगड, खाणे पिणे, मजा, गप्पा, खरेदी अशा सगळ्याच गोष्टींशी घातली गेली आहे. दिवाळी हा उत्सव आनंदाचा आपल्या सर्वांच्या आयुष्यातही उत्साह आणि आनंद आणणारा ठरो !