न्या शिंदे समिती बरखास्त करा, भुजबळ झाले आक्रमक
हिंगोली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजातील मागासलेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली शिंदे समिती बरखास्त करून गेल्या दोन महिन्यांत दिलेले कुणबी दाखले रद्द करण्याची मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. आज हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यातील सर्व लोकसंख्येचे सर्वंकष सर्वेक्षण करून जातनिहाय जनगणना करण्याची विनंती भुजबळ यांनी आज केली . एखाद्या समाजाचे मागासलेपण ठरवण्यासाठी प्रत्येकाच्या परिस्थितीचे सखोल आकलन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आज ओबीसी एल्गार परिषदेच्या वेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
सारथीला मिळालेले लाभ ओबीसींच्या महाज्योती आणि इतरांना मिळावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शिंदे समितीच्या स्थापनेमागे मराठ्यांचे मागासलेपण सिद्ध करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र उच्च न्यायालयाने मराठा समाज मागासलेला नाही, असा निकाल दिला आहे, त्यामुळे शिंदे समितीचा हेतू संशयास्पद असून, त्यांना निकाल देण्याचा अधिकार नसल्याने ती रद्द करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली.
उच्च न्यायालयाने सांगितले मराठा समाज मागास नाही मग ही समिती कशासाठी असा सवाल त्यांनी केला.या समितीला कुणालाही मागास ठरवण्याचा अधिकार नाही. दोन महिन्यात देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या अशी मागणी ही छगन भुजबळ यांनी केली.
सर्व समाजाचा तुलनात्मक अभ्यास करा, ज्यामध्ये निरगुडे आयोग आणि गायकवाड आयोग या दोघांची भूमिका असेल मात्र, केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करून पुरेसे होणार नाही; सर्वसमाज इतरांपेक्षा अधिक प्रगत आहेत की नाही हे निर्धारित करण्यासाठी सर्वेक्षण केले पाहिजे. केवळ एका समाजाचे प्रभावीपणे सर्वेक्षण करणे योग्य नाही. त्यामुळे कोणता समाज वंचित आहे हे ओळखण्यासाठी तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे असे भुजबळ म्हणाले. Dismiss Shinde committee, Bhujbal became aggressive
ML/KA/PGB
26 Nov 2023