शिक्षक दिनाच्या परिसंवादात लोकशाहीच्या मूल्य शिक्षणावर चर्चा

सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षक दिनाच्या या परिसंवादात केवळ औपचारिक शिक्षणावर चर्चा न करता लोकशाही मूल्ये रुजवणारे सर्वागीण शिक्षण आणि ते शिक्षण देणारे विविध क्षेत्रांतील शिक्षक यांवर ऊहापोह केला जाणार आहे, अशी माहिती कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
शाळा कॉलेज मधील मुलांना मतदान प्रक्रियेबाबत सजग करण्यासाठी येत्या डिसेंबर जानेवारीमध्ये महाराष्ट्रातील शाळाकॉलेजमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतील असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
उद्या, ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनानिमित्त राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे ‘लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होतील.
मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परिसंवादात पत्रकार जुईली पांगम, जीवनशाळेचे प्रतिनिधी हसन खान, कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे, कृषी उद्योजक पंकज दळवी हे युवा प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत.
ML/KA/SL
4Sept. 2023