नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग , सतर्कतेचा इशारा…
नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण ९३.४ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून काल सायंकाळपासून टप्याटप्याने विसर्गात वाढ केली जात आहे.यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, सिन्नर, निफाड, येवला आदी तालुक्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सर्वच धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
ML/ML/SL
25 August 2024