अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या (NIH) संचालकपदी डॉ. जय भट्टाचार्य

वॉशिग्टन डी.सी., दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सरकारसाठी महत्त्वाच्या पदांवर काही भारतीय वंशाच्या लोकांचीही नियुक्ती करत आहेत. ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे फिजीशियन आणि अर्थतज्ज्ञ डॉ. जय भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या (NIH) संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या वैद्यकीय संशोधन संस्थेची जबाबदारी जय भट्टाचार्य यांच्याकडे असेल.NIH चे संचालक म्हणून भट्टाचार्य 27 संस्थांवर देखरेख करतील. या संस्था लस तयार करण्याचे आणि साथीच्या रोगांसाठी नवीन औषधे विकसित करण्याचे काम करतात.
डॉ. भट्टाचार्य यांनी X वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. भट्टाचार्य म्हणाले –
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संचालक म्हणून निवड केल्याचा मला सन्मान वाटतो. आम्ही अमेरिकेच्या वैज्ञानिक संस्थांमध्ये सुधारणा करू जेणेकरुन त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवता येईल आणि अमेरिकेला पुन्हा निरोगी बनवण्यासाठी विज्ञानाचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल.
जय भट्टाचार्य यांचा जन्म 1968 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांनी 1997 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधून एमडी पदवी आणि 2000 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. भट्टाचार्य हे ‘ग्रेट बॅरिंग्टन मॅनिफेस्टो’च्या तीन प्रमुख लेखकांपैकी एक आहेत. हा जाहीरनामा 2020 मध्ये कोरोनाच्या काळात जारी करण्यात आला होता. निरोगी लोकांमध्ये विषाणूचा प्रसार होऊ द्यावा, असे सांगण्यात आले. असे केल्याने, विषाणूंविरूद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित केली जाऊ शकते.
SL/ML/SL27 Nov. 2024