कोल्हापूरातून या शहरांसाठी थेट विमान सेवा

येत्या 15 मेपासून बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूर या मेट्रो शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. या नव्या सेवेमुळे कोल्हापूरची सात मेट्रो शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून, स्थानिक नागरिकांना प्रवासात मोठी सुलभता मिळणार आहे. नुकतेच याबाबत संजय घोडावत समुहाच्या स्टार एअरने याबाबत घोषणा केली आहे.
सध्या स्टार एअर कोल्हापूरहून अहमदाबाद, मुंबई आणि तिरुपती या तीन शहरांसाठी आठवड्याला 16 उड्डाणे चालवते. 15 मेपासून बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूर या तीन नव्या मार्गांची भर पडणार असून, एकूण उड्डाणांची संख्या 28 पर्यंत वाढणार आहे. यापुढे 3 जून 2025 पासून ही संख्या आणखी वाढवून आठवड्याला 32 उड्डाणे करण्याचे नियोजन आहे. यामुळे कोल्हापूरहून अहमदाबाद, मुंबई, तिरुपती, बेंगळुरू, हैदराबाद, नागपूर आणि किशनगढ या सात शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूरहून बेंगळुरू आणि मुंबईसाठी थेट विमानप्रवास आता ERJ-175 विमानांमधून बिझनेस क्लासच्या सुविधेसह करता येणार आहे.