अनुसूचित जमाती आरक्षणासाठी धनगर समाजाचे आझाद मैदानात पिवळे आंदोलन
मुंबई, दि २१:
राज्यातील धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती(एस.टी)या प्रवर्गामधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्यभरातून धनगर समाज बुधवारी विविध जिल्ह्यांमधून मुंबईत दाखल झाला.
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. आज सायंकाळी चार वाजता बोराडे आझाद मैदानात आले.यावेळी धनगर समाज बांधव हजारीमल सोमाणी मार्ग येथून घोषणा देत याठिकाणी आझाद मैदानावर आले. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
दरम्यान,काही आंदोलकांना कफ परेड,डोंगरी, जे जे.मार्ग,येलो गेट,वडाळा,कुलाबा व डी.बी मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.
राज्यघटनेने धनगर समाजाला अनूसूचित जमातीचे (एस.टी) आरक्षण दिले आहे.या आरक्षणाची अंमलबजावणी राज्यसरकारने तात्काळ करावी,अशी धनगर समाजाची मागणी आहे.२०१४ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करु,असे आश्वासन दिले होते.पण;त्यांनी ते आश्वासन पाळले नाही.देशात सुमारे २५ कोटी तर महाराष्ट्रात अडीच ते ३ कोटी धनगर समाजाची लोकसंख्या आहे.या समाजाला घटनेने अनूसुचित जमातीचे आरक्षण दिले आहे.पण;७ दशकाहून हे आरक्षण मिळालेले नाही. राज्यकर्त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप धनगर समाज बांधवांचा आहे.
तत्कालीन काॅंग्रेस आघाडी सरकारने समाजाला न्याय न दिल्याने २०१४ ला लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाने साथ दिली.त्यावेळी फडणवीस यांनी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करु,असे आश्वासन दिले होते.पण;अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. तरी लवकरात लवकर ही अंमलबजावणी करावी अशी आमच्या समाज बांधवांची मागणी असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली.KK/ML/MS