अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार
मुंबई, दि. १ : ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर यांना भीमराव धुळप यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या धगधगती मुंबईतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विवेक पाटकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येकाला सन्मानाचे भाग्य मिळत नाही. परंतु धगधगती मुंबई च्या माध्यमातून संपादक भीमराव धुळप यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे. कुठेतरी अंधारामध्ये असलेल्या वंचित घटकांना प्रकाश झोतात आणण्याचे काम ते गेली सोळा वर्षे करीत आहेत. हेच कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी धगधगती मुंबईचे कौतुक केले.
साप्ताहिक धगधगती मुंबईच्या सोळाव्या वर्धापनदिना निमित्त आयोजित केलेल्या नवी मुंबई, कोपरखैरणे येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृहातील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई महापौर सुजाता पाटील, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, ॲड. स्मिता चिपळूणकर, उद्योजक हनुमंत रांजणे, के. के. शेलार व लोक कलावंत योगेश चिकटगावकर व धगधगती मुंबई संपादक भीमराव धुळप, सरपंच रमेश धनावडे यांच्यासह मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे हितचिंतक मित्र परिवार व कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील घोगाव येथील धुळप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली १६ वर्ष महाराष्ट्रात लेखणी धगधगती ठेवली . भीमराव धुळप व त्यांचे चिरंजीव ओमकार धुळप यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये चांगली टीम तयार केलेली आहे. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने उपेक्षितांची बाजू मांडणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे . वृत्तपत्रातही स्पर्धा असली तरी आपल्या उत्पन्नातील वाटा समाजासाठी खर्च करणाऱ्या पत्रकारांबद्दल समाज सुद्धा जागृत असल्याचे दिसून आले आहे. अशा शुभेच्छा देऊन अशा कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक व नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांच्यासह मान्यवरांनी आश्वासन देऊन सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा मोठा गौरव होत असतो. परंतु सामान्य माणसांसाठी पुरस्कार देऊन त्यांना उत्साहित करणे. हे काम खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारी वाढवणारी आहे. सर्व स्तरातील लोकांचा बहुमान ही अद्भुत शक्ती सर्वांच्या पाठीशी कायम राहणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार व रमेश कदम (समाज रत्न) वसंत जाधव (समाज गौरव) राजन किणे (दलित मित्र) रमेश धनावडे (आदर्श सरपंच) प्रताप महाडिक (शिक्षण रत्न) संगम प्रतिष्ठान व नरेंद्र छाया कम्प्युटर इन्स्टिट्यूट (उत्कृष्ट संस्था पुरस्कार) नंदकुमार काटकर (सहकार रत्न) डॉक्टर शांताराम कारंडे (साहित्यरत्न) सचिन वरखडे वैद्यरत्न ( वैद्यकीय) अँड .मनीषा चव्हाण (कायदा रत्न) डॉक्टर सुरज पाटील (वैद्यकीय रत्न) विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी (अध्यात्मिक) अनुजा दांडगे (उद्योजिका) के.के शेलार (उद्योग रत्न) हनुमंत रांजणे (समाजभूषण) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार राहुल शेवाळे, नवी मुंबई आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी प्रेमानंद जगताप, शुभम कांबळे, तानाजी गायकवाड, वाकळवाडी सरपंच डोईफोडे, कल्पना जगताप, वैशाली कांबळे यांच्यासह सातारा, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वाशी, जावळी महाबळेश्वर तापोळा व कराड परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन युवा पत्रकार ओमकार धुळप यांच्यासह धगधगती मुंबईच्या सर्व पत्रकारांनी उत्कृष्टरित्या केल्याबद्दल गणेश नाईक यांनी या सर्वांचे मनापासून कौतुक केले. विविध संगीताच्या कार्यक्रमाने अनेकांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन करून कलावंतांनी चांगली गीत सादर केले होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.ML/ML/MS