रोठा सुपारीचे संकरीत वाण विकसित
श्रीवर्धन, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड तालुक्यांतील रोठा सुपारी जगप्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला मधूर असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते.मात्र उंच वाढणारी ही सुपारीची झाडे वादळात उन्मळून पडतात. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीवरील ६० टक्के झाडे उन्मळून पडली होती. वीस वर्षांची मेहनत वाया गेल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्यातून रोठा सुपारीची उंचीने कमी असलेली, बुटकी जात विकसित केली जात आहे.
वादळानंतर रोठा सुपारीची नव्याने लागवड करण्यासाठी रोपांचीही कमतरता भासू लागली. बाहेरील रोपे आणून त्यांची लागवड करण्यास स्थानिक बागायतदार उत्सुक नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागा आणि सुपारी संशोधन केंद्राच्या रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून ती वितरित करावीत, अशी मागणी बागायतदारांची होती.सुपारीच्या स्थानिक जातींची झाडे उंच वाढतात. त्यामुळे वादळात ती उन्मळून पडतात. शिवाय झाडे उंच असल्याने त्यांचे व्यवस्थापन किंवा काढणीची कामे त्रासदायक ठरतात. अशा वेळी रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बागायतदारांना अधिकाधिक उत्पन्न घेता येईल.
या नवीन वाणाबाबत बोलताना सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धनचे प्रभारी अधिकारी,डॉ. एस. एन. सावंत म्हणाले, “वादळामध्ये नुकसान टळावे, यासाठी रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याचा प्रयोग सुरू आहे. प्राथमिक स्तरावर वेगवेगळ्या संशोधन केंद्रांत लागवड केली आहे. झाडांची उंची कमी राहणार असल्याने चक्रीवादळात नुकसानीचा धोका कमी असेल. कीडरोग व इतर व्यवस्थापन तसेच काढणीचे काम सोपे जाईल.आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते.”
SL/KA/SL
7 Sept. 2023