देशमुख, राऊतांना ईडी लावता, मग कराडला का नाही?

 देशमुख, राऊतांना ईडी लावता, मग कराडला का नाही?

पुणे दि १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड आणि परभणीमध्ये जे काही झालं आहे, त्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले जातील. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे होता. अनेक नेत्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन नेत्यांवर ऐकीव माहितीवर आरोप झाले आणि त्यांनी राजीनामे दिले आहेत. बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं पाहिजे त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले जातील असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

परळी आणि बीडमध्ये मंगळवारी गुंडांना सोडवण्यासाठी टायर जाळण्यात आले, लोक टॉवरवर चढले, दुकाने बंद करण्यात आली. हे महाराष्ट्रात काय चाललंय, गृहमंत्री काय करत आहेत, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्यसूत्रधार म्हटला जाणारा वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर परळीमध्ये बाजारपेठ बंद करण्यात आली. कराड समर्थक टॉवरवर चढले, त्याची पत्नी आणि आई यांनी मकोका मागे घेण्यासाठी आंदोलन सुरु केले. परळीमध्ये जाळपोळ करण्यात आली. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत. असे असताना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असेही सुळे म्हणाल्या.

वाल्मीक कराड यांच्या संपत्ती संदर्भात रोज विविध माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे किती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. यापूर्वी ऐकीव माहितीवर अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांवर ईडी लावली. मात्र वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाही? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

उशिरा का होईना वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका लावला गेला आम्ही अभिनंदन करतो. पण पुढे काय? आम्हाला न्याय अपेक्षित आहे कारण एका मुलाचा खून झाला आहे. खंडणी वसुली होत असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूकदार दहावेळा विचार करतील गुंतवणुकीच्या आधी. बीड आणि परळीमध्ये पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर किती बरं झालं असतं. संतोष देशमुख यांची मुलगी दहावीत आहे, तिचं खेळण्याचं वय आहे पण दिवंगत वडिलांसाठी न्याय मागते आहे. हा आपला महाराष्ट्र आहे का? वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी बीडची ही घटना आहे. जे कुणीही यामध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

ML/ML/SL

15 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *