उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला

ओंकारेश्वर, 9 : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचे तीर्थस्थान असून, येथे मिळालेल्या दर्शनाचे भाग्य हा एक अध्यात्मिक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ओंकारेश्वर मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, अहिल्याबाई होळकर यांचा या मंदिराशी असलेला सांस्कृतिक व धार्मिक संबंध याविषयीही त्यांनी माहिती जाणून घेतली.
त्याचबरोबर त्यांनी ममलेश्वर व ओंकारेश्वर या पवित्र स्थळांना भेट देत नर्मदा नदीच्या तीरावर विधिवत पूजा व आरती केली. नर्मदेच्या प्रवाहात शुद्धतेची प्रतीक म्हणून माता नर्मदेची आरती करत, त्यांनी नद्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रार्थना केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “गंगा जशी प्रयागराजमध्ये शुद्ध स्वरूपात दिसते, त्याचप्रमाणे नर्मदा व देशातील इतर नद्या देखील शुद्ध, निर्मळ आणि सदैव प्रवाही राहाव्यात, अशी प्रार्थना आज मी केली आहे. या नद्यांचे जतन करण्याची शक्ती आम्हाला मिळावी.”
त्याचबरोबर महिलांचे आणि बालकांचे जीवन सुरक्षित राहावे, देशाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही वसुंधरेचे रक्षण व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी नर्मदेचरणी केली. “हर नर्मदे!” असा जयघोष करत त्यांनी ही भावना व्यक्त केली.
यावेळी ओंकारेश्वर मंदिरात मराठी पंडित मोठ्या संख्येने उपस्थित होते.