धार्मिक पशुवधासाठी देवनार पशुवधगृहात विविध प्रकारची चोख व्यवस्था

 धार्मिक पशुवधासाठी देवनार पशुवधगृहात विविध प्रकारची चोख व्यवस्था

मुंबई, दि 17
बकरी ईद २०२५ सणाच्या निमित्ताने धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा MyBMC अॅप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, देवनार पशुवधगृह येथे पशु बाजार तसेच धार्मिक पशुवधासाठी विविध प्रकारची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेत सहभागी सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पूर्वतयारींचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक १६ मे २०२५) आयोजित समन्वय बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव, पोलिस उपायुक्त (वाहतूक-३) श्री. प्रदीप चव्हाण, सहायक आयुक्त (मालमत्ता) श्री. पृथ्वीराज चौहाण, सहायक आयुक्त (एम पूर्व) श्री. उज्ज्वल इंगोले, सहायक पोलिस आयुक्त (देवनार विभाग) श्री. राजेश बाबशेट्टी, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्याचे अधिकारी, पोलिस दल, महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, कोरा केंद्र, वैध मापनशास्त्र विभाग, अदानी इलेक्ट्रिसीटी आदी यंत्रणांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, देवनार पशुवधगृहात विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारींचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या की, ईद सणाच्या कालावधीत नागरिकांची होणारी मोठी गर्दी, पशुंची संख्या तसेच उपाहारगृहासारख्या सुविधा देताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. येथे येणाऱ्या नागरिकांना नाममात्र शुल्कात वाहनतळ उपलब्ध करुन द्यावे. वाहनतळासह देवनार पशुवधगृहाच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवावी. सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत दक्ष राहत चोख कायदा व सुव्यवस्था राखावी. नागरिकांना सुस्पष्टपणे दिसतील, अशाप्रकारचे सूचना फलक जागोजागी लावावेत. परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तात्काळ कारवाई करावी आणि कारवाईसाठी विशेष पथक नेमावे, इत्यादी निर्देशही डॉ. जोशी यांनी यावेळी दिले.
बकरी ईद २०२५ सण हा संभवत: दिनांक ७ जून २०२५ व त्यानंतरच्या दोन दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत दिनांक ७ ते ९ जून २०२५ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १०९ ठिकाणी धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्देशित ठिकाणी किंवा इतर ठिकाणी धार्मिक पशुवध करावयाचा असल्यास त्याच्या परवानगीकरिता अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा MyBMC मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना अॅपवर नोंदणी करावी लागेल. संबंधित जागा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा खासगी मालकीची असल्यास त्यासंबंधीत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तसेच अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन परवाना) अर्ज करताना अपलोड करावे लागेल. किती पशुंचे आणि कोणत्या दिवशी धार्मिक पशुवध करावयाचे आहे, याचा उल्लेख अर्ज करताना करावा लागेल. धार्मिक पशुवध करतेवेळी MyBMC मोबाईल ॲपमध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच, धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अन्य यंत्रणांच्या माध्यमातून खालील सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत.
१. देवनार येथे पशुंसाठी सुमारे ७७ हजार ८५० चौरस मीटर क्षेत्रावर निवारा उभारण्याचे काम सुरू आहे. २५० केव्हीए क्षमतेचे ८ आणि १२५ केव्हीए क्षमतेचे १९ विद्युत जनित्र येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.
२. बकरी ईद सणाच्या १५ दिवसांच्या कालावधीदरम्यान देवनार पशुवधगृह आणि आसपासच्या परिसरातील कचऱ्यांचे निर्मूलन आणि विल्हेवाटीसाठी तीन पाळ्यांमध्ये ३०० स्वच्छता कर्मचारी, पिकअप व्हॅन, जेसीबी, डंपर यांच्यासह मृत जनावरे वाहून नेण्यासाठी ४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी १०० फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
३. सुरक्षेच्या दृष्टीने ७ हँडमेटल डिटेक्टर, ५ डोअर मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरा आणि देखरेखीसाठी व्हिडिओ वॉल यंत्रणाही कार्यरत असेल.
४. देवनार पशुवधगृह परिसरात महानगरपालिकेचे २०० सुरक्षारक्षक दोन पाळीत तैनात असतील.
५. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४ X ७ कार्यरत नियंत्रण कक्ष आणि ९९३०५०१२९३ या क्रमांकावर मदतसेवा (हेल्पलाईन) देखील सुरू राहील. ४ ठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी फलकांच्या माध्यमातून दिशादर्शन व सूचना प्रदर्शित करण्यात येतील.
६. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निवासी वाड्यांमध्ये २ हजार ७५० अग्निशामक बाटल्या, रेतीच्या बादल्या व २०० लीटर क्षमतेच्या १०० पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
७. व्यापाऱ्यांची नोंदणी व प्राण्यांचे आवक-जावक व्यवस्थापन करण्यासाठी क्यूआर कोड पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
८. नागरिकांसाठी २ आरोग्य केंद्र आणि ३ रुग्णवाहिका तसेच पशुंसाठी २ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येत आहे.
९. पशुवधगृहात येणाऱ्या नागरिक तसेच व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येत आहे.
१०. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी उपसा पंप बसवण्यात येत आहेत.
११. म्हैसवर्गीय पशुंच्या धार्मिक पशुवधाची व्यवस्था देवनार पशुवधगृहात करण्यात आलेली आहे. यास्तव, मुंबईत इतरत्र कोठेही सदर पशुंचा धार्मिक पशुवध करता येणार नाही. अशा प्रकारच्या अनधिकृत पशुवधाबाबत कारवाई केली जाईल. या दृष्टीने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे यांसाठी प्रत्येकी १ याप्रमाणे भरारी पथक नेमण्यात येत आहे.KK.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *