राज्यातील लोककलाकारांचे सर्व्हेक्षण करण्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांकडे मागणी.
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासन दरबारी कुठे नोंद नसलेल्या राज्यातील दुर्लक्षित आणि उपेक्षित लोककलाकारांचे सर्व्हेक्षण व्हावे अशी मागणी लोककला क्षेत्रातील तज्ञांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.
सध्या महाराष्ट्रात अंदाजे पंधरा हजार कलावंत आपल्या कलेच्या उपजिविकेवर जगत आहेत मात्र शासन दरबारी त्याची कुठेच नोंद नाही. तमाशा -लावणी,भारूड दशावतार, कीर्तन, खडीगंमत,शाहिरी, झाडीपट्टी, वासुदेव,जागरण गोंधळ, वही गायन,जाखडी नृत्य, दंडार, सर्कस,अशा विविध प्रमुख असणाऱ्या कला क्षेत्रातील काम करणारे कलाकार आज ही विविध योजनेपासून उपेक्षित आहेत. त्यांच्याकडे शासनाच्या योजना वेळेत पोहचत नाही म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाने या लोककलाकारांचे सर्व्हेक्षण करावे अन त्यांना ओळखपत्र दयावे अशी जोरदार मागणी सध्या कला क्षेत्रातून होत आहे.
त्यानुसार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना एका लेखी पत्राच्या माध्यमातून सदर मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लाखो रुपये खर्च करून राज्यातील लोककलेचे सर्व्हेक्षण केले आहे. परंतु हे काम समाधानकारक झाले नाही, आतापर्यत संपूर्ण राज्यातील सुमारे 85 लोककला प्रकाराचे सर्व्हेक्षण झाले आहे. अशी माहिती लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी दिली.
राज्य सरकारने जर लोककलाकारांचे सर्व्हेक्षण केले तर निश्चितच सांस्कृतिक कार्य विभागाला कलाकारांसाठी नवीन योजना अंमलात आणायला सोपे जाईल असे त्यांचे मत आहे.
सध्या मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 37 हजार जेष्ठ कलावंतांची अधिकृत नोंद सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे असल्याचे कळते.
ML/ML/SL
10 Jan. 2025