हळद संशोधन केंद्र, सांगलीत सुरू करण्याची मागणी

सांगली दि २८ — सांगली ही पश्चिम महाराष्ट्रातील हळद खरेदी विक्रीची देशातील अग्रेसर बाजारपेठ आहे. या पेठेत महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यातील शेतकरी आपली हळद विक्रीसाठी आणतात. हळद विक्री, प्रक्रिया, निर्यात यासह सर्व सुविधा सांगलीत आहेत.
हळदीचे एग मार्क कार्यालय आणि हळद पूड तयार करण्याचे 50 कारखाने या भागात आहेत. राजापुरी हळद हे सांगलीतील प्रसिद्ध उत्पादन मानले जाते. गेली पन्नास वर्षे या भागात हळद व्यापाराची परंपरा आहे. लिलाव पद्धतीने आजही या ठिकाणी हळदीचे सौदे निघतात. स्थानिक तसेच बाहेरचे व्यापारी सौद्यात सहभागी होतात. हळद विक्रीवर बाजार समिती नियंत्रण ठेवते. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील यावर लक्ष दिले जाते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामान यांना सांगली चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे एक निवेदन देण्यात आले. त्यात हळद संशोधन केंद्र सांगलीत करण्याची मागणी करण्यात आली. उद्योगमंत्र्यांनी तशी शिफारस केंद्राकडे करावी अशी मागणी करण्यात आली.
या भागात हळद लागवडीचे क्षेत्र वाढत असून संशोधन केंद्र झाल्यास या व्यवसायाला दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.