विधानरिषदेच्या उपसभापतीना अपात्र करण्याची मागणी

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेत आज पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला.मात्र यानंतर विरोधकांनी उपसभापती नीलम गोर्हे यांच्या पक्ष बदलावरून गदारोळ करत सभात्याग केला.
शेकापचे जयंत पाटील यांनी सभापतींना कोणताही पक्ष नसतो असं सांगत हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला यावरून विरोधक आक्रमक झाले. उपसभापती नियमांची पायमल्ली करत आहेत असा आरोप करत विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या . यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर हरकतीचा मुद्दा मांडत विरोधकांच्या वर्तनावर आक्षेप घेतला.सभापतींवर आक्षेप घेता येत नाही , नियमबाह्य कामकाज चालवता येणार नाही असं सांगत नोटीस न देता हा मुद्दा मांडता येणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं.
अशाप्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नाही असं ते म्हणाले . उपसभापती नीलम गोर्हे यांनीही आजचं कामकाज होऊ द्यावे असं विरोधकांना सांगितलं. हा मुद्दा गटनेत्यांच्या बैठकीत का मांडला नाही असा सवाल त्यांनी केला . मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला. या गोंधळातच
२०२३-२४ च्या ४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त मंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडल्या. अध्यादेश आणि अन्य कागदपत्र मांडण्यात आली.
निरंजन डावखरे, अरुण लाड, राजेश राठोड आणि नरेंद्र दराडे यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली. डॉ. माणिकराव मंगुडकर, प्रभाकर दलाल या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहाने श्रद्धांजली अर्पण करत शोकप्रस्ताव मंजूर केला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
ML/KA/SL
17 July 2023