ओशो आश्रमावर निबंधक नेमण्याची मागणी
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओशोच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला व त्यांच्या शिष्यांच्या देणगीतून उभा राहिलेला पुण्यातील कोरेगाव येथील ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनावर कारवाई करून त्यावर निबंधक नेमण्यात यावा अशी मागणी ओशो महाराष्ट्र संघाच्या ऍड. वंदना जाधव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित परिषदेत केली.
ऍड. जाधव बोलताना म्हणाल्या की, १९७४ साली पुण्यातील कोरेगाव येथे स्थापन झालेल्या ओशो आश्रमात १९ जानेवारी १९९० आचार्य ओशो रजनीश यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युच्या अल्पावधीतच ओशोच्या शिष्यत्वाचा गैरवापर करुन काही शिष्यांनी फेब्रुवारी १९९१ ला नवीनच ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन स्थापन केली.त्यांनी आश्रमातील संपूर्ण पुस्तकाची, उपदेशाची, व्हिडिओची, चक्क कॉपीराईट करून या सर्वांचा जागतिक बाजार केला. ओशोच्या कार्याचे व्यापारीकरण करण्यात आले.
गेल्या ३२ वर्षांपासून या संस्थेचा एककलमी उद्देश अनेक उदाहरणावरून व पुराव्यावरुन हाच दिसला की ओशोला जगाच्या नकाशावरून कसे हद्दपार करावे व अध्यात्मिक ओळख समूळ नष्ट कशी करावी. हा भारतासहीत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य ओशो शिष्यावर घोर अन्याय आहे. या संस्थेच्या अनिष्ट कारभारामुळे महाराष्ट्राच्या संत परंपरेची फार मोठी न भुतो भविष्यती अशी अध्यात्मिक हानी झालेली आहे.असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रच्या “अध्यात्मिक टूरिझमला” या ओशो आश्रममुळे चालना मिळाली. या आश्रमची तुलना भारतातल्या काशी, मथुरा, शिर्डी साईबाबा, केदारनाथ, वैष्णोदेवी, तिरुपती, श्री विठ्ठल क्षेत्र पंढरपूर, जेजुरी तुळजाभवानी, गजानन महाराज शेगांव व छत्रपती शिवाजी महाराज समाधी रायगड इतक्या उच्च दर्जाचे आहे.असे सांगून ऍड जाधव म्हणाल्या की, ही जागा शक्तीचा, उर्जेचा, ध्यान लहरीचा फार मोठा खजाना आहे. यामध्ये प्रत्येक मनुष्याच्या सकारात्मक जीवन रुपांतरचा मंत्र आहे.
मायबाप सरकार या आश्रमाला अभय देऊन आश्रमच्या व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई करावी , तसेच हा आश्रम शासनाने ताब्यात घेऊन तेथे निबंधक नेमावा अशी मागणी जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली.
ML/KA/PGB
16 Nov .2022