रत्नागिरी जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात दिरंगाई
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नयनरम्य निसर्ग सौदर्य लाभलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला साधारणपणे २ ते ३ हजार मिमि पाऊस पडतो. असे असले तरीही जिल्हाच्या बहुतांश भाग डोंगर उताराचा असल्याने आणि मातीची पाणीधारण क्षमता कमी आहे. त्यामुळे पावसाळा उलटल्यावर काही दिवसातच जिल्ह्यातील मोठ्या भागाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यातच यंदा सरासरी पाऊस ठिक असले तरीही ऑक्टोबर हिटचा कालावधी लांबल्याने जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.यावर उपाय म्हणून डिसेंबरपूर्वी प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आराखडा सादर करण्यामध्ये दिरंगाई होत आहे.
आतापर्यंत लांजा आणि संगमेश्वर या दोनच तालुक्यांचे आराखडे सादर झाले आहेत. उर्वरित तालुक्यांमधील टंचाईच्या बैठकाच झाल्या नसल्याने जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडण्याची चिन्हे आहेत. चिपळूण तालुक्यातील दोन गावांमध्ये तर पाणीटंचाई सुरू झाली आहे. मात्र या तालुक्यांचा अद्याप टंचाई कृती आराखडाच तयार झालेला नाही. त्याचबरोबर मंडणगड, दापोली, खेड, गुहागर आणि रत्नागिरी या तालुक्यांचेही पाणीटंचाई कृती आराखडे तयार झालेले नाहीत.
केवळ दोन तालुक्यांचेच आराखडे आल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जलजीवनच्या माध्यमातून पाणी योजना राबवण्यात आल्या असल्या तरी तीव्र उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटल्यास तीव्र पाणीटंचाई होऊ शकते त्यासाठीच कृती आराखडे लवकरच तयार करून त्यावर वेळेत काम होणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे तालुकास्तरावर दुर्लक्ष केले जात आहे.गतवर्षी जिल्ह्याचा टंचाई आराखडा फेब्रुवारीअखेर मंजूर करण्यात आला होता. ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी देण्यात आली होती. यंदा लवकरच पाणीटंचाई सुरू झाल्याने टंचाई आराखड्याच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांचा ओघ वाढल्याने हॉटेल आणि होम स्टे हा व्यवसायही वाढीस लागला आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात चालना देणाऱ्या या पर्यटन उद्योगालाही पाणी टंचाईचा फटका बसू शकतो.
SL/KA/SL
30 Dec. 2023