देहदान हे सर्वश्रेष्ठ दान : सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकरांसह अनेकांनी केले देहदानाचे संकल्प

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एखादा विचारवंत माणूसच देहदानासारखा संकल्प करु शकतो. ‘देहदान’ हे मोठे पुण्यकर्म असून आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी व्यतीत केलेल्या भाई देऊलकरांसारख्या मान्यवराने वयाच्या 76 व्या वर्षी देहदानाचा संकल्प करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे, असं प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजय परब यांनी केले.
शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून देहदानाचा संकल्प जाहीर करून आपला जन्मदिवस अभिनव पद्धतीने साजरा केला. त्यावेळी संजय परब बोलत होते. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तालुका अध्यक्ष सुनील राऊळ, ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर, अभिमन्यू लोंढे, दीपक गावकर, दीनानाथ बांदेकर, सुधीर पराडकर, बाबुराव कविटकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देऊलकर यांच्या देहदानाच्या निर्णयाचे कौतुक करून त्यांना भगवद्गीता भेट दिली. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. सध्याच्या घडीला जगभरात नेत्र, अवयव व देहदानाचे महत्त्व वाढत असून ही चळवळ उभी राहत आहे. आपल्या देशातही आता याबद्दलच्या प्रबोधनामुळे हळूहळू दानाचे प्रमाण वाढते आहे. भाई देऊलकरांच्या या मोठ्या निर्णयामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. उपस्थितांचे आभार भाई देऊलकरांचे सुपुत्र आणि मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार ‘दै. वृत्तमानसचे निवासी संपादक शाम देऊलकर यांनी मानले.
देहदानाचा निर्णय घेताना विशेष समाधान
25 वर्षांपूर्वी आमच्या वडिलांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती पण तत्कालिन स्थितीमुळे ती इच्छा पूर्ण करणे त्यावेळी शक्य झाले नाही. आता माझ्या देहदानाचा निर्णय घेतांना मला विशेष समाधान वाटत आहे, असे भाई देऊलकर आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले. भविष्यात देहदान, अवयवदान आणि नेत्रदानाच्या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अन्य दोघांनीही जाहीर केला देहदानाचा निर्णय
या कार्यक्रमात आंबोली सैनिक स्कूलमधील शिक्षक परमेश्वर सावळे व सर्पमित्र महेश राऊळ यांनीही देहदानाचा निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर सुधीर पराडकर, संजय पिळणकर, त्यांच्या पत्नी समृद्धी पिळणकर, सरिता मुणनकर यांनी नेत्रदानाचा निर्णय जाहीर केला. KK/ML/MS