आर्द्रतेत घट, कमाल तापमान वाढणार- जाणून घ्या कृषी सल्ला
मुंबई,दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी कोकण विभागासाठी चार दिवसांसाठीचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यामध्ये दि. १६ ते १९ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान आर्द्रतेत घट, कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या बदलत्या हवामानानुसार आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी, भाजीपाला पीके आणि अन्य फळपिकांबाबत, तसेच पशुधनाबाबत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शनही करण्यात आले आहे. ग्रामीण कृषि हवामान सेवा कृषि विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी हा कृषी सल्ला प्रसिद्ध केला आहे.
कृषि सल्ला
- तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेला पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच रोपांना वरून सावली करावी. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे. आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी झाडाचे कडक उन्हापासून तसेच बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी.
आंबा: - कमाल तापमानातील वाढीमुळे तसेच आर्द्रते घट आणि बाष्पीभवनात वाढ झाल्याने आंबा झाडाला ताण बसून फळगळ होण्याची तसेच प्रखर सूर्यकिरणामुळे फळे भाजण्याची शक्यता असल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात द्यावे तसेच झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
- वाढीच्या अवस्थेतील आंबा फळे प्रखर सूर्यकिरणामुळे भाजण्याची शक्यता असल्याने प्रखर सूर्यकिरणापासून संरक्षण करण्याकरिता अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ.बा.सा. कोकण कृषि.विद्यापीठ शिफारशी नुसार २५ x २० सें.मी. आकाराची कागदी/ वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
भाजीपाला पिके:
- तापमानात वाढ संभवत असल्याने भाजीपाला पिकांना गरजेनुसार हलके सिंचन द्यावे. पिकास संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळी पाणी द्यावे.
तापमान वाढीमुळे बाष्पीभवनात वाढ होवून जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो यासाठी भाजीपाला लागवडीमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी पेंढा किंवा गवताचे आच्छादन करावे. - पशुसंवर्धन:
- जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे. तसेच उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वैरणीवर १ टक्के गुळपाणी आणि ०.५ टक्के मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करून शिंपडावे.
- उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल.
- तापमानात वाढ संभवत असल्याने उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याचे शेडचे छप्पर गवत, भाताचा पेंडा, किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्यावेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने गोठयाच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. जनावरांना सकाळी किंवा सायंकाळी चरावयास न्यावे. दुपारच्या वेळी जनावरांना चरावयाला नेणे टाळावे तसेच सावलीत बांधावे.
ML/KA/SL
16 Feb. 2023