आफ्रिकेतून कुनोत आणलेल्या चित्त्याचा मृत्यू

छायाचित्र प्रातिनिधिक
भोपाळ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता. यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘प्रोजेक्ट चीता’ सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत आफ्रिकेतील नामिबीयामधुन चित्ते आणून ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते.
साशा गेल्या अनेक आठवड्यापासून किडनीच्या आजाराने पीडित होती. साशाच्या गंभीर आजाराची माहिती झाल्यानंतर मध्य प्रदेश वन विभागाच्या पथकाने एक आपत्कालीन मेडिकल रेस्पॉन्स टीम श्योपुर येथील कुनोमध्ये पाठवली होती. साशाची प्रकृती जानेवारी महिन्यात खराब झाली होती. प्राथमिक तपासणीत साशाला डायरिया झाल्याचे समोर आले होते.
साशाला किडनीचा गंभीर आजार झाला होता. साशाचे आयुष्य वाचवण्यासाठी पशू चिकित्सक डॉक्टर अतुल गुप्ता यांच्या नेतृत्वात भोपाळमधून एक टीम कुनो पार्कमध्ये पाठवण्यात आली होती. भोपाळपासून कुनो नॅशनल पार्क जवळपास ३५० किलोमीटर दूर आहे. त्यावेळी साशाला Fluids दिले होते आणि तिच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र आता साशाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ‘प्रोजेक्ट चीता’ वर काहीशी निराशेची छाया पसरली आहे.
SL/KA/SL
28 March 2023