खोकल्याच्या औषधामुळे सरकारी रुग्णालयात ६ बालकांचा मृत्यू

भोपाळ, दि. १ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या औषधामुळे सहा बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. राजस्थानमध्येही अशाच औषधामुळे एका मुलाचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित औषधावर स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे.
गेल्या महिन्यात छिंदवाडा परिसरात खोकल्याचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी सरकारी रुग्णालयातून औषधे घेतली. मात्र, औषध सेवनानंतर काही मुलांमध्ये मूत्रविसर्जन करताना जळजळ, ताप न उतरणे आणि तब्येतीत सतत घसरण अशी लक्षणे दिसू लागली. काही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासणीत औषधामध्ये डायएथिलीन ग्लायकॉल नावाच्या रसायनाचे प्रमाण अत्याधिक असल्याचे आढळून आले. हे रसायन मूत्रपिंडासाठी अत्यंत घातक असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राजस्थानमध्येही याच औषधामुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याने तिथल्या प्रशासनानेही तत्काळ बंदी लागू केली आहे. संबंधित औषधे राज्य सरकारमार्फत खरेदी करण्यात आली होती, अशी माहिती मिळते.
सध्या या प्रकरणाची चौकशी विविध स्तरांवर सुरू असून औषध निर्मिती, वितरण आणि गुणवत्ता नियंत्रण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.