चष्म्याशिवाय वाचता येईल, असा दावा करणाऱ्या आयड्रॉपवर DCGI कडून बंदी

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने बुधवारी PresVu नावाच्या आय ड्रॉप्सचे उत्पादन आणि विपणन परवाना रद्द केला. या आय ड्रॉपची निर्मिती मुंबईस्थित औषधनिर्मिती कंपनी एन्टॉड फार्मास्युटिकल्सने केली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की प्रिस्बायोपिया (वाढत्या वयाबरोबर जवळची दृष्टी कमकुवत होणे) ग्रस्त लोकांना याचा फायदा होतो. डोळ्यात आयड्रॉप टाकल्यानंतर चष्मा लावण्याची गरज भासणार नाही. चष्मा नसतानाही पुस्तक सहज वाचता येते.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या आय ड्रॉपला परवानगी दिली होती. प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदीचा प्रचार केल्याचा आरोप कंपनीवर आहे. हा आयड्रॉप ऑक्टोबरमध्ये बाजारात येणार होता. डीसीजीआयने सांगितले की कंपनी ओटीसी (ओव्हर द काउंटर) म्हणून त्याची जाहिरात करत आहे. ओटीसी औषधे अशी आहेत जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी केली जाऊ शकतात.
औषध कंपनी एन्टॉड फार्मास्युटिकल्सने सांगितले की, त्यांनी जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी माहिती दिलेली नाही. DCGI ने या औषधाला मान्यता दिली होती. आम्ही 234 रुग्णांवर त्याची यशस्वी चाचणी केली. ज्या रुग्णांनी आयड्रॉप वापरले. ते चष्म्याशिवाय वाचू शकत होते. निलंबनाच्या आदेशाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.
SL/ML./SL
12 Sept 2024