स्व.दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला

मुंबई, दि. ३- माजी खासदार, आमदार व समाजसेवक स्व.दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्व.दि.बा.पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यात येणार असून दिल्लीला तसा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
स्व.दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ५ वेळा आमदार, १ वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य ,महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार, पनवेल नगर परिषदेचे लोकनियुक्त पहिले अध्यक्ष, कुलाबा लोकल बोर्डचे सदस्य होते. त्यामुळे त्यांचे सामाजिक काम पाहता त्यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे. अशी मागणी स्थानिक गावक-यांनी केली होती. यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आले होते. भिवंडीचे खा. सुरेश म्हात्रे यांनी नुकतीच कार रॅली काढून स्व.दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या रॅलीत खा. संजय दिना पाटील यांनीही भाग घेतला होता. स्व.दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला न दिल्यास विमानतळावर एकही विमान उडू देणार नाही. असा इशारा खा. सुरेश म्हात्रे यांनी दिला होता. यासंदर्भात खा. सुरेश म्हात्रे व खा. संजय दिना पाटील तसेच आगरी समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथी गृहात भेट घेऊन चर्चा केली. स्व.दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. अशी माहिती खा. संजय दिना पाटील यांनी दिली.ML/ML/MS