दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.
फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.
इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी, 2024 ते गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 व इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
SL/KA/SL
1 Nov. 2023