पैनगंगा नदीवरील बंधारे कोरडे, रब्बीची पिके धोक्यात

वाशीम, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवर बाळखेड, भापुर आणि धोडप बुद्रुक परिसरात कोल्हापुरी बंधारे असून हे सर्व कोल्हापुरी बंधारे पाण्या अभावी कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेली पैनगंगा नदीकाठची शेकडो हेक्टर वरील रब्बीची गहू,हरभरा,बीजवाई कांदा तसेच ऊस ही पिके धोक्यात आली आहेत.परिणामी या पिकांच्या उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर रिसोड तालुक्यातील बाळखेड,धोडप,मसला पेन अशी 6 कोल्हापुरी बंधारे बांधलेली आहेत. या बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्यावर नदी काठच्या शेकडो हेक्टर शेतीचे सिंचन होते मात्र सद्यस्थितीत हे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. वाशीम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम तालुक्यातून वाहणाऱ्या पैन गंगा नदीच्या पाण्यावर दोन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर सिंचनाखाली आली आहे.
या नदीवर रिसोड तालुक्यात कोल्हापुरी बंधारे तर वाशिम तालुक्यात बॅरेजेस बांधण्यात आली आहेत. काही वर्षां अगोदर पैनगंगा नदी ही एप्रिल महिन्या पर्यंत पाण्याने प्रवाहित राहत असल्याने कोल्हापुरी बंधारे आणि बॅरेजेस मध्ये पाणी असायचे ज्यामुळे शेकडो हेक्टर शेती चे सिंचन होत असे मात्र सद्यस्थितीत पैन गंगा नदी प्रवाहित नसल्याने रिसोड तालुक्यातील 6 ही कोल्हापुरी बंधारे कोरडे पडली आहेत.
त्यामुळे रब्बी ची हरभरा,गहू,कांदा बीज आणि ऊस या पिकांना सिंचन करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा एकही ठेंब नाही त्यामुळे येथील रब्बीतील गहु, हरभरा, ऊस, बिजवाई कांदा पाण्या वाचुन धोक्यात आला आहे. शासनाने या कोल्हापूरी बंधाऱ्याचे रुपांतर बॅरेजेस मध्ये करावे त्यामुळे नदीपात्रात पाणी साठा उपलब्ध राहील अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी करीत आहेत.
ML/ML/SL
21 Feb. 2025