डाळ + तांदूळ खिचडी
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डाळ + तांदूळ खिचडी नवीन काहीच नाही या प्रकारात, फोडणीच काय ती जरा वेगळी; दोनच जिन्नस वापरून केलेली आहे. त्याचा वेगळा स्वाद जाणवतो. साजुक तूप + जिर्याचा स्वाद अन तमालपत्राचा सुवास मस्त येतो.
लागणारे जिन्नस:
– एक मध्यम वाटी तांदूळ
– एक मध्यम वाटी सालाची मुगाची डाळ
– मीठ
– हळद
– एक/ दोन तमालपत्रं
– भरपूर जिरं
– तिखट आवडत असेल तर काही मिरीदाणे (शक्यतो यात घालत नाहीत, पण खातांना मध्ये मध्ये आलेले मस्त लागतात; नाही घातले तरी चालेलच)
– तेल किंवा आवडीप्रमाणे साजुक तूप (शक्यतो गाईचं)
क्रमवार पाककृती:
– डाळ + तांदूळ एकत्र करून स्वच्छ धूवून, १५/२० मिनिटं पाण्यात भिजवावे.
– कुकरला नेहेमीप्रमाणे खिचडी शिजवून घ्यावी. शिजतांना, मीठ + हळद घालावं.
– कुकरचं प्रेशर गेलं की गरम असतांनाच, त्यात खिचडी पातळसर/ पळीवाढी होईल इतकं पाणी घालावं. पुन्हा गरम करत ठेवावी ही खिचडी.
– आता आवडीप्रमाणे जरा सढळ हातानी तेल किंवा तुपाची फोडणी करावी. त्यात भरपूर जिरं अन तमालपत्र घालून खमंग फोडणी खिचडीवर ओतावी. मिरीदाणे घेतले असतील तर ते फोडणीत घालावे.
– नीट ढवळून रटरटू लागली की गरमागरमच खावी. हवं असेल तर अजून साजुक तूप वरून घेता येईल. v
ML/KA/PGB
22 sep 2024