दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याची परिवहन मंत्र्यांची मागणी

 दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याची परिवहन मंत्र्यांची मागणी

मुंबई दि. १२ – मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास, स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *