लवकरच सुरु होणार दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकल ट्रेन आणि रस्त्यावरील रहदारीमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मेट्रोच्या सविधेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. महानगराच्या विविध भागांत टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या विरार लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. ते कमी करण्यासाठी दहिसर ते भाईदर दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे लोकांना भाईदर ते दहिसर असा प्रवास करता येईल. मुंबईतील दहिसर ते मीरा भाईदर मेट्रो सेवा यावर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर या मेट्रो-9 कॉरिडॉरचा पहिला टप्पा चालू करण्याच्या योजनेवर एमएमआरडीएने या वर्षी काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर (पूर्व) ते काशीगाव मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो-9 सेवा सुरू करण्यात येणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
चार मेट्रो स्थानकांमधील सेवा 2025 च्या मध्यात किंवा अखेरीस सुरू होईल अशी अपेक्षा आहे. एमएमआरडीएने मेट्रो-9 चे 92 टक्के काम पूर्ण केले आहे. पहिल्या टप्प्यातील स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो-9 दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) दरम्यानच्या मेट्रो-7 कॉरिडॉरला आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पश्चिम) दरम्यानच्या मेट्रो-2A कॉरिडॉरला जोडलेले आहे. एमएमआरडीए मेट्रो-9 साठी चारकोप डेपो वापरण्याच्या तयारीत आहे. मेट्रो-9 चे कारशेड तयार होईपर्यंत ते मेट्रो-7 आणि मेट्रो-2A कॉरिडॉरच्या डब्यांच्या देखभालीसाठी सज्ज आहे. या योजनेच्या आधारे मुंबईकरांना 2025 मध्ये आणखी एक मेट्रो मिळू शकते. मीरा-भाईंदर मेट्रो मार्ग दहिसर ते भाईंदर (पश्चिम) 10.41 किमी लांबीचा आहे. यात 8 स्थानके असतील. ही मेट्रो पूर्णपणे एलिव्हेटेड आहे.
SL/ML/SL
3 Jan. 2025