पूर्व किनापट्टीवर आज रात्री धडकणार दाना चक्रीवादळ
भुवनेश्वर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी फिरला असताना आता पूर्व किनारपट्टीवर वेगवान वादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आता ओडिशाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर ते ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम सुरू झाला असून ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तर चक्रवादळानंतर वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक असेल. महाराष्ट्रात देखील पुढील 24 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात उगम पावलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ उतरेल. ही प्रक्रिया किमान पाच तास तरी चालेल आणि त्यानंतर ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून हे चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने पुढे जाईल. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. ओडिशातील १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून विमानाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वेदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना येथून परत पाठवण्यात आले आहे.