,महाराष्ट्रात 7 ऑक्टोबरला वादळी ‘कमबॅक’, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

 ,महाराष्ट्रात 7 ऑक्टोबरला वादळी ‘कमबॅक’, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मुंबई दि ७ : हवामान विभागाने ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण विभागातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून ढगांच्या गडगडाटासह हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यांवर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली आणि धाराशिवमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढू शकते. या भागांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून हवामान स्वच्छ आणि ऊन पडलेले राहील.

तर दुसरीकडे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुढील दोन दिवस अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पाऊस अजून थांबलेला नाही. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये वादळी वातावरणाची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी हे हवामान अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *