जागतिक चिमणी दिवसानिमित्त सायकल रॅली
नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिमण्यांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून , 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. चिमणी संवर्धनासाठी जागर करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण विभाग नाशिक , पश्चिम वनविभाग नाशिक आणि नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिमणी संवर्धन विषयी जनजागृती पर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये 110 सायकलिस्टनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सर्व सायकलिस्ट अनंत कान्हेरे मैदान येथे जमले. मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, उपवनसंरक्षक पंकज गर्गे ,सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे आणि वनपरीक्षेत्र उपाधिकारी , कर्मचारी तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे ,उपाध्यक्ष डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले, प्रवीण कोकाटे आणि इतर सायकलिस्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
“चिमणी संवर्धन आपली जबाबदारी” “उन्हाळा आला पाणी देऊया चिऊताईला”,
“झाडे लावा झाडे जगवा ,
चिमणी वाचवा” हा संदेश देत सायकल रॅली ची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. रॅलीचा मार्ग* – गोल्फ क्लब-सिटी सेंटर- एबीबी सर्कल – जेहान सर्कल – जूना गंगापूर नाका सिग्नल- अशोकस्तंभ- सी.बी.एस – मुख्य वनसंरक्षक कार्यालय, त्रंबक नाका असा होता
मुख्य वन संरक्षक कार्यालय येथे सर्व सायकलिस्टस् चे स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये चिमणी संवर्धनाविषयी आकर्षक संदेश बोर्ड तयार करणाऱ्या सौ चंदाराणी गवारे, प्रवीण खोडे, संतोष चापोरकर, वृषाली हिरे ,किरणकुमार वामन , डॉ. अपूर्वा रौंदळ, मेघा सोनजे या सायकलिस्टला चिमणीचे घरटे देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यावरण प्रेमी ॲड. अविनाश भिडे यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकाने घरटी तयार करावी आणि ती इतर मित्रांना भेट म्हणून द्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.या रॅली करिता गणेश आर रणदिवे (विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण नाशिक जिल्हा ) यांचे मार्गदर्शन लाभले.
ML/ML/SL
20 March 2024